ऑनलाइन टीम
पाटणा, दि. १४ - अवाच्या सवा आलेलं विजेचं बिल कमी करण्यासाठी याआधी मीपण वीजमंडळाच्या अधिका-यांना लाच दिली आहे, असे खुद्द बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनीच म्हटले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार नितीशकुमार मुख्यमंत्री असताना झाला असून त्यांच्या काळात भ्रष्टाचार कमी झाला हे काही खरं नाही असं ते म्हणाले आहेत. भ्रष्टाचाराला आपण आळा घातल्याचा दावा करणा-या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांसाठी हा राजकीय सेल्फ गोल झाल्याचे मानण्यात येत आहे. नितीशकुमार आता भाजपाला थोपवण्यासाठी लालूप्रसाद यादवांची साथ घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर मांझी यांचे विधान अडचणीचे ठरेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
नितीश कुमारांच्या काळात विकासाची खूप कामे झाली परंतु भ्रष्टाचार कमी झाला नाही असे त्यांनी सांगितले. मी एका अधिका-याच्या घरावर धाड घालण्यास सांगितले, त्यावेळी करोडो रुपये मिळाल्याचे सांगताना भ्रष्टाचार किती बोकाळलाय हे कळते असेही त्यांनी सांगितले. बिहारमध्ये २१ ऑगस्ट रोजी पोटनिवडणुका होत असून मांझी यांचे वक्तव्य जनता दलाला भोवण्याची भीती आहे.