नवी दिल्ली : मॅगी नूडल्सप्रकरणी तपासाची व्याप्ती वाढवत, सर्व राज्यांतील मॅगी नूडल्सचे नमुने तपासण्याची तयारी सरकारने चालवली असतानाच, या उत्पादनाची जाहिरात केल्यामुळे गोत्यात आलेले मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी प्रथमच यासंदर्भात आपले मौन तोडले आहे. कुठल्याही उत्पादनाची वा कंपनीची जाहिरात करताना मी स्वत: अतिशय दक्ष आणि सतर्क असतो, असा दावा अमिताभ यांनी केला आहे.मॅगीच्या नमुन्यांमध्ये मोनो सोडियम, ग्लॅटामेट आणि शिशाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्यानंतर उत्तर प्रदेशातील अन्न व औषध प्रशासन विभागाने बाराबंकीच्या स्थानिक न्यायालयात नेस्ले इंडियाविरुद्ध प्रकरण दाखल केले आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील एका स्थानिक वकिलाने एक एफआयआरही दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये अमिताभ, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांच्या नावांचा समावेश आहे. माधुरीआधी अमिताभ मॅगी नूडल्सच्या जाहिरातील झळकत होते. या पार्श्वभूमीवर अमिताभ यांनी सोमवारी प्रथमच आपले मौन तोडले. मी स्वत:च्या बचावासाठी आपल्या करारपत्रात एक विशेष तरतूद जोडली आहे. मॅगी नूडल्सची जाहिरात करण्यापूर्वी आपले उत्पादन योग्य आहे काय? आणि तुम्ही याबाबत निश्चिंत आहात का? असे मी नेस्ले इंडियाला विचारले होते. भविष्यात काही आक्षेपार्ह घडल्यास, आपण माझा बचाव करणार, अशी एक अटही मी माझ्या करारपत्रात घातली होती. माझा या जाहिरातीबाबतचा करार संपलेला आहे आणि तूर्तास मी या जाहिरातीत नाही, असे अमिताभ एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.सेलिब्रिटीरूपात मला वादात गोवले जाते. त्यामुळे मी कायम अतिशय सतर्क असतो. विशेषत: खाद्य पदार्थाच्या जाहिराती करताना मी दक्ष असतो. कारण यासंदर्भात नेहमी वाद उत्पन्न होतात. सेलिब्रिटी असाल तर तुम्हाला वादात ओढले जाते, असेही ते म्हणाले.
मी अतिशय दक्ष आणि सतर्क असतो - अमिताभ
By admin | Updated: June 2, 2015 08:51 IST