बेंगळुरू : येथील जिंदाल निसर्गोपचार केंद्रात खोकला आणि मधुमेहावर उपचार घेतल्यानंतर मी आता ‘फिट अॅण्ड फ्रेश’ असून कामावर परतण्यास उत्सुक आहे, असे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.४६ वर्षीय केजरीवाल गत १२ दिवसांपासून जिंदाल निसर्गोपचार केंद्रात भरती होते. गत ५ मार्चला आपल्या माता-पित्यांसह ते बेंगळुरूला उपचारासाठी रवाना झाले होते. उपचारादरम्यान मीडिया आणि कामाच्या व्यापापासून दूर राहिल्यानंतर केजरीवाल सोमवारी दिल्लीत परतले. तत्पूर्वी केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवरून आपण कामावर परतण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. ‘खोकला पळाला आहे. मधुमेह नियंत्रणात आहे. आता मी फ्रेश अॅण्ड फिट आहे.आणि कामावर परतण्यास उत्सुक आहे’ असे टिष्ट्वट त्यांनी केले आहे. जिंदाल निसर्गोपचार केंद्र, त्यांचे डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. एक आगळीवेगळी संस्था स्थापन करून ती इतक्या उत्तमपणे सांभाळण्यासाठी सीतारामजी यांचे अभिनंदन. अशा संस्था देशभर व्हाव्यात, असेही त्यांनी म्हटले.केजरीवाल बेंगळुरूमध्ये उपचार घेत असताना आम आदमी पार्टीत अंतर्गत वादाने तोंड काढले होते. प्रारंभी आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर त्यांच्याच पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी केजरीवालांविरोधात मोर्चा उघडला होता. केजरीवाल यांनी गेल्या वर्षी दिल्लीत सरकार स्थापनेसाठी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची गोष्ट केली होती, असा आरोप करीत गर्ग यांनी पुराव्यादाखल आॅडिओ क्लिपही जारी केली होती. याच क्लिपचा हवाला देत मुंबईत पक्षाचा चेहरा राहिलेल्या अंजली दमानिया यांनी राजीनामा दिला होता.प्रशांत भूषण केजरीवालांना भेटणार?आम आदमी पार्टीच्या राजकीय कामकाज समितीतून (पीएसी) उचलबांगडी झाल्यानंतर प्रशांत भूषण अरविंद केजरीवाल यांना भेटण्यास उत्सूक आहे. मी योगेन्द्र यादव यांच्यासह केजरीवालांना भेटू इच्छितो. त्यांनी वेळ दिल्यास पक्षांअंतर्गत वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न मी करणार आहे,असे भूषण यांनी सोमवारी म्हटले.
‘मी फिट अॅण्ड फ्रेश’-केजरीवाल
By admin | Updated: March 16, 2015 23:41 IST