ऑनलाइन लोकमतभुवनेश्वर, दि. २२ - पत्नीने उशीरा चहा दिल्याच्या किरकोळ कारणावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना ओदिशा येथे घडली आहे. महालिया नायक असे या पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ढेंकनाल जिल्ह्यातील गुहालीपाल गावात राहणा-या महालिया नायकने (वय ५६ वर्ष) सकाळी पत्नी झाना यांच्याकडे चहा मागितला. झाना यांनी चहा द्यायला उशीर केल्याने नायक संतापले. यावरुन दाम्पत्त्याध्ये वाद सुरु झाला. बुधवारी रात्री महालियाने पुन्हा हा वाद उकरुन काढत पत्नीशी भांडण करायला सुरुवात केली. भांडणादरम्यान पत्नीने जेवण बनवायला नकार दिल्यावर महालियाने तीक्ष्ण हत्याराने पत्नीवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या झाना यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी महालियाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने भांडणाचे मूळ कारण सांगितले.