सूरत : दिवाळीत मालकाने नोकरांना मिठाईच्या खोक्यासह बक्षिसी देण्याची भारतीय व्यापार-उद्योग विश्वातील जुनी परंपरा आहे. पण हिऱ्यांना पैलू पाडण्याचा व्यवसाय करणाऱ्या सूरतमधील कंपनीने यंदा आपल्या १,२०० कर्मचाऱ्यांना घरे, मोटारी व दागिन्यांची ‘दिवाळी भेट’ देऊन या परंपरेला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.हरिकृष्ण एक्स्पोर्ट या कंपनीने रविवारी येथे आयोजित केलेल्या एका नेत्रदीपक समारंभात आपल्या ५०० कर्मचाऱ्यांना नव्या कोऱ्या फियाट पुन्टो मोटारी, ५७० कर्मचाऱ्यांना दागिने व २०७ जणांना त्यांच्या पसंतीचे फ्लॅट दिवाळीनिमित्त भेट दिले.कंपनी निष्ठावंत कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याचा ‘लॉयल्टी प्रोग्रॅम’ गेली पाच वर्षे राबवीत आहे. यंदा यासाठी निवड झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यास सरासरी ३.६० लाख या दराने एकूण ५० कोटी रुपयांची दिवाळी भेट दिली गेली. अशा प्रकारे व एवढ्या उदारपणे दिवाळी भेट देणारी आमची कंपनी ही जगातील पहिली कंपनी आहे, असे सांगताना हरिकृष्ण एक्स्पोर्ट््चे अध्यक्ष सावजी मकवाणा म्हणाले, की माझ्या कामगार-कर्मचाऱ्यांनी निष्ठेने काम केल्यानेच आज माझी कंपनी यशाच्या शिखरावर आहे. त्यांच्यामुळेच माझे स्वप्न साकार होऊ शकले आहे. त्यामुळे त्यांच्या निष्ठेची खुल्या दिलाने कदर करणे हे मी माझे कर्तव्यच समजतो. हिरे व्यापाराच्या दुनियेत ‘सावजीकाका’ म्हणून ओळखले जाणाऱ्या मकवाणा यांनी सांगितले, की आज माझ्या कंपनीतील हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या प्रत्येक कारागिराचा व अभियंत्याचा महिन्याचा सरकारी पगार एक लाख रुपयांच्या घरात आहे. एका कारागिराची कमाई तर ३.४९ लाख रुपये आहे. या कुशल कारागिरांच्या जिवावर आमचा धंदा चालतो व त्यांना सर्वोच्च पगार देऊन आम्ही आमच्या उद्योगात उदाहरण घालून दिले आहे.
बाराशे कर्मचाऱ्यांना घरे, मोटारींची भेट!
By admin | Updated: October 21, 2014 04:20 IST