लाँड्रीचालकाचा प्रामाणिकपणा दोन तोळ्यांची सोन्याची अंगठी केली परत
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
वाघापूर : सध्या माणुसकी हरवत चालली आहे आणि प्रामाणिकपणा कमी होत चालला आहे, असे असतानाच एक सुखद घटना घडली आहे. कपड्यात सापडलेली दोन तोळ्यांची अंगठी संबंधित मालकाला परत देणारा लाँड्रीचालक सासवडमध्ये आढळून आला आहे.
लाँड्रीचालकाचा प्रामाणिकपणा दोन तोळ्यांची सोन्याची अंगठी केली परत
वाघापूर : सध्या माणुसकी हरवत चालली आहे आणि प्रामाणिकपणा कमी होत चालला आहे, असे असतानाच एक सुखद घटना घडली आहे. कपड्यात सापडलेली दोन तोळ्यांची अंगठी संबंधित मालकाला परत देणारा लाँड्रीचालक सासवडमध्ये आढळून आला आहे.सासवड (ता. पुरंदर) येथील अशोक नारायण पवार हे सासवडमध्ये सोपाननगर रस्त्यावर कपडे धुणे व इस्त्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे माहुर (ता. पुरंदर) येथील ज्ञानेश्वर लक्ष्मण जगताप हे कपडे धुवायला देतात. नेहमीप्रमाणेच जगताप यांनी कपडे दिल्यानंतर कपडे धुवत असताना पवार यांच्या हाताला काही तरी लागले. त्यांनी कपड्याचे खिसे तपासून पाहिले असता, त्यामध्ये सोन्याची अंगठी आढळून आली. पवार यांनी जगताप यांना मोबाईलवरून ही माहिती दिली. त्या वेळी ती अंगठी दोन तोळ्यांची असल्याचे सांगितले.सध्या सोन्याची किंमत दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. परंतु, तरीही दोन तोळ्यांच्या अंगठीपेक्षा प्रामाणिकपणा केव्हाही महत्त्वाचा असे सांगून पवार यांनी ती अंगठी परत केली. जगताप यांनी या प्रामाणिकपणाबद्दल बक्षीस म्हणून त्यांना एक हजार रुपये रोख दिले. परंतु, हे पैसे आपले नाहीत. ते समाजाच्या उपयोगी आले पाहिजेत, असे म्हणून त्यांनी ही रक्कम सासवडमधील कस्तुरबा गांधी आश्रमातील मुलांच्या खाऊसाठी देण्याचे जाहीर केले.