नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकजच्या ‘कथित लाचखोरी’च्या वृत्तांमुळे भाजपातील अंतर्गत वातावरण ढवळून निघाले असून, यासंदर्भात राजनाथ व पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) खुलासा करावा लागला आहे़ माझ्या व माझ्या मुलासंदर्भात पसरवल्या जात असलेल्या बातम्यांमध्ये जराही तथ्य आढळल्यास मी राजकारण सोडून घरी बसेन, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे, तर पीएमओनेही या निव्वळ अफवा असल्याचा निर्वाळा दिला आहे़पंकज याने काम करून देण्यासाठी लाच घेतली आणि हे कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला बोलावून त्याची कानउघाडणी केल्याचे वृत्त मीडियाने दिले आहे़ राजनाथ यांनी आपल्या मुलाबद्दल अफवा पसरविल्या जात असल्याचा दावा केला असून, यासाठी एका सहकारी मंत्र्याला जबाबदार धरले आहे़ याबाबत त्यांनी भाजपा आणि संघपरिवाराकडे तक्रार केल्याचेही वृत्त आहे़ बुधवारी खुद्द राजनाथ यांनी याप्रकरणी प्रथमच मौन सोडले़ आपण हे प्रकरण मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याही कानावर टाकले़ त्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त करून या बातम्या निराधार ठरवल्या, असेही ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
पुत्रप्रेमामुळे गृहमंत्री गोत्यात
By admin | Updated: August 28, 2014 03:40 IST