पाटणा : बिहारमध्ये पूजा, होम हवन यासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आग पेटवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या काळात आग न पेटवण्याचे आवाहन करणारे परिपत्रक काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र सकाळी ९ वाजण्यापूर्वी वा संध्याकाळी ६ वाजल्यानंतर हे धार्मिक विधी करता येतील. राज्याच्या अनेक भागांत वाढत्या तापमानामुळे आगीच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभुमीवर नितीशकुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.नितीश कुमार यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवांना संबंधित आदेश काढून त्याची माहिती राज्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगीच्या वाढत्या घटनांचा आढावा घेत असताना नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांत पाटणा, नालंदा, भोजपूर, रोहतास, बक्सर आणि भाबुआ या ठिकाणी धार्मिक समारंभाच्या वेळी आगी लागण्याचे प्रकार घडले होते. याखेरीज मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा सचिवांनाही विजेच्या तारा खाली लोंबता कामा नयेत, त्या सैल ठेवू नका, नादुरुस्त तारा ताबडतोब दुरुस्त करा, असे आदेश दिले आहेत. कोणत्याही कारणांनी लागणाऱ्या आगीत मरण पावणाऱ्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब आर्थिक मदत दिली जावी आणि जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात यावेत, अशाही सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगीशी सामना करण्यासाठी लागणारी उपकरणे खरेदी करण्याचे आदेशही आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. (वृत्तसंस्था)>दारूबंदीमुळे गुन्हेगारी व अपघातांमध्ये घटबिहारमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून लागू करण्यात आलेल्या दारूबंदीमुळे गुन्हेगारीचे प्रमाण २७ टक्क्यांनी कमी झाले आहे. शिवाय अपघातांच्या प्रमाणातही घट झाली आहे. गेल्या २० दिवसांतील आकडेवारीच्या आधारे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. बिहारमध्ये ५ एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात आली असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
होम-हवन, पूजेवर बिहारमध्ये निर्बंध
By admin | Updated: April 29, 2016 05:14 IST