मुंबई : राजकीय धुळवड खेळण्यात नेहमी मग्न असणाऱ्या देशभरातील राजकीय नेत्यांनी गुरुवारी मात्र कार्यकर्त्यांसोबत रंगांची उधळण केली. मिठाई वाटून आणि होळी, धूलिवंदनाच्या शुभेच्छा देऊन सण उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. सणाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुख्यालय रंगात रंगून गेले होते. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि खासदारांची भेट घेतली.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शाईफेक प्रकरणातून धडा घेत खास सावधगिरी बाळगली. त्यांच्या निवासस्थानी बाहेरचे रंग आणण्यावर बंदी घालण्यात आली होती. राज्यात दुष्काळसदृश स्थिती असल्यामुळे बहुतेक सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले होते, मात्र होलिकादहन करून आणि कोरडे रंग खेळून परंपरा जपण्यात आली. होळी हा रंगांचा उत्सव आहे. आपण आयुष्यात रंग भरले पाहिजेत. देशाची विविधरंगी संस्कृती जपली पाहिजे. इतरांच्या आनंदासाठी झटले पाहिजे. - व्यंकय्या नायडू, केंद्रीय नगरविकास मंत्री
राजकीय नेत्यांची कार्यकर्त्यांसह होळी
By admin | Updated: March 25, 2016 01:54 IST