नवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या जामीन अर्जावर सोमवारपासून सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्या. प्रतिभा राणी यांनी २४ फेब्रुवारी रोजी होणारी सुनावणी लांबणीवर ढकलली होती. दिल्ली पोलिसांनी त्याची पुन्हा कोठडीत चौकशी करण्याची मागणी केली.देशद्रोहाखाली अटक झालेल्या उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य या अन्य दोन आरोपींसमक्ष त्याची चौकशी करण्यासाठी याआधी केवळ एक दिवसाची कोठडी ठोठाविण्यात आली होती. या दोघांनी २३ फेब्रुवारीच्या रात्री पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. या दोघांनाही २९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे. ‘रोहित का जेएनयू’‘रोहित का जेएनयू’ अशी पोस्टर्स संपूर्ण विद्यापीठात लागलेली आहेत. तिहार कारागृहातून मुक्त होऊन कन्हैया कुमार परत येण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. कन्हैयासह दिल्ली विद्यापीठातील पीएच.डी.चे विद्यार्थी आत्महत्या करणारा हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करीत आहेत. याआधी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन पुकारले होते. त्यानंतर रोहितची आत्महत्या गाजल्यानंतर गेल्या आठवड्यात रॅली काढण्यात आली होती. सरकारने हा असंतोषाचा आवाज मानत कन्हैयाला लक्ष्य बनविले होते, असे जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्ष शेहला रशीद शोरा यांनी म्हटले.दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यावर रविवारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे जेएनयूमधील वादाला नवे वळण मिळाले आहे. (वृत्तसंस्था)
कन्हैयाच्या जामिनावर आजपासून सुनावणी
By admin | Updated: February 29, 2016 03:07 IST