अभिरुची बदलल्याने दर्जेदार गीतसंगीत हरविले (भाग २)
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
नागपूर माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखेच
अभिरुची बदलल्याने दर्जेदार गीतसंगीत हरविले (भाग २)
नागपूर माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखेच या महोत्सवासाठी बऱ्याच वर्षांनी नागपुरात येणे झाले. इथे नेहमीच यावेसे वाटते पण देवाच्या मर्जीप्रमाणेच आपण पोहोचू शकतो. येथे अनेक मोठे कवी झाले. त्यांच्या नगरीत येणे म्हणजे देवस्थानालाच भेट देण्यासारखे आहे. कविश्रेष्ठ सुरेश भट, ग्रेस हे मराठीतले श्रेष्ठ कवी इथलेच होते. त्यांच्या कवितांमधून ते आजही भेटतात. त्यांना भेटण्यासाठी बरेचदा नागपूरला येणे व्हायचे. त्यामुळेच नागपूर आवडते आणि येथील दर्दी रसिकही आवडतात. येथे गाणे सादर करण्यात आनंद वाटतो, असे आशाताई म्हणाल्या. --------------राजकारण हे माझे क्षेत्र नाहीमला राजकारणात कधीही यावेसे वाटले नाही. तो माझा स्वभावच नाही. राजकारण फार वेगळ्या लोकांसाठी आहे कदाचित ती गुणवत्ता माझ्याजवळ नाही. त्यात माझा स्वभाव अजिबातच राजकारणी नाही. आपल्या मनात जे येईल ते बोलून आपण मोकळे होतो. आपल्या घरातलेच राजकारण समजून घेता आले तरी पुरे, असे मला वाटते. मनमोकळे राहण्यातच तर खरी गंमत आहे. या वयातही मी गाणे म्हणते आणि लोकांना ते आवडते. लोक प्रेम करतात यापेक्षा अजून काय हवे? एखाद्या पुरस्कारापेक्षाही लोकांचे प्रेम मला जास्त महत्त्वाचे वाटते. देवाने भरभरून दिले असताना कशाला पुन्हा राजकारणात जायचे. आता मला काहीही मागायचे नाही आणि इच्छाही नाही. ----------नागपूरकरांनी खूप प्रेम दिलेमुळात मंगेशकर कुटुंबाला नागपूर - विदर्भाने खूप प्रेम दिले आहे. त्याचा इतिहासच आहे. बळवंत नाट्य मंडळींसह माझे वडील दीनानाथ मंगेशकर येथे यायचे. त्यावेळी येथे दोन मजली नाट्यगृह होते. एकदा तर बाबांचे गाणे ऐकण्यासाठी इतकी गर्दी झाली की दुसरा मजलाच कोसळला होता. ही बाब मला आईने सांगितली. त्यावेळी मी खूपच लहान होते. त्यावेळी वडिलांना एका गीतासाठी २२ वेळा वन्समोअर मिळाला होता. त्यानंतर हृदयनाथवरही आणि माझ्यासह दीदींवरही विदर्भातल्या रसिकांनी खूप प्रेम केले. त्यामुळे विदर्भाशी आमचे ऋणानुबंध कायम जुळले आहेत. येथे आल्यावर मी भट आणि ग्रेस यांना खूप मिस करते.