ऑनलाइन टीम
बदायू (उत्तरप्रदेश), दि. १५ - उत्तरप्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आता गंभीररुप धारण करत असून बदायू येथे पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपींमध्ये पोलिस कर्मचा-याचा मुलाचाही समावेश असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
बदायू येथे काही दिवसांपूर्वी दोघा बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांचे मृतदेह झाडावर लटकवले होते. त्यापाठोपाठ भाजपच्या दोघा नेत्यांची हत्या झाल्याने उत्तरप्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे. बदायूत एका विवाहीत महिलेवर तिघा नराधमांनी बलात्कार केला. शुक्रवारी रात्री पिडीत महिला तिच्या दोन लहान मुलांसह औषध आणायला गेली. तिथे महिलेला हिमांशू नामक तरुण भेटला. हिमांशूचे वडिल पोलिस असून सध्या ते बहजोई पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. हिमांशूने महिलेला नवीन भाड्याची खोली मिळवून देण्याचे आमीष दाखवत बांधकाम सुरु असलेल्या घरात नेले. तिथे हिमांशू व त्याच्या सोबत आलेल्या दोघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. शनिवारी सकाळी तिला या प्रकाराची वाच्यता केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देत सोडून दिले. यानंतर पिडीत महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत हिमांशू व अन्य दोघांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
उत्तरप्रदेशमधील भाजप नेत्यांच्या हत्येचे सत्रही सुरु आहे. रविवारी बरेलीत उत्तराखंडमधील भाजप नेते राकेश रस्तोगी यांचा मृतदेह कारमध्ये आढळला. रस्तोगी यांचे हात बांधलेले होते. तसेच त्याच्या मृतदेहावर चाकूने वार केल्याचे आढळले आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपच्या खासदार निरंजन ज्योती यांच्यावरही शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. सुदैवाने ज्योती या हल्ल्यातून बचावल्या.
राजकीय नेत्यांवरील हल्ले व महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे उत्तरप्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर सपाचे प्रमुख मुलायम सिंह यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव व अन्य मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे.