नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकावर काँग्रेस आणि डाव्यांचा विरोध मावळला नसताना सरकारने रविवारी या मुद्यावर विरोधकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याच्या मुद्यावर कुठलेही आश्वासन देणे टाळले.केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना जीएसटी, संघ परिवार तसेच बिहार निवडणुका आदी मुद्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. मी विरोधकांना सहकार्याचे आवाहन करतो, जेणेकरून संसदेत जीएसटी विधेयक पारित होऊ शकेल. जीएसटी विधेयक पारित झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळू शकेल, असे राजनाथ यावेळी म्हणाले. सरकार हे विधेयक पारित करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार का? असे विचारले असता त्यांनी यावर स्पष्ट आश्वासन देणे टाळले. कुठलीही शक्यता नाकारता येत नाही, केवळ एवढेच उत्तर त्यांनी दिले.जीएसटी विधेयक लोकसभेत पारित झाले आहे, मात्र राज्यसभेत ते रखडले आहे. राज्यसभेत काँग्रेस, डावे आणि अण्णाद्रमुक आदी पक्षांनी या विधेयकात काही दुरुस्त्यांची मागणी करीत त्यास विरोध चालवला आहे.बिहार मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवर लवकरच निर्णयबिहारात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यावर भाजपाचे संसदीय बोर्ड लवकरच निर्णय घेईल. बिहारात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर करावा वा नाही, यावर बोर्ड विचार करेल, असेही राजनाथसिंग यांनी यावेळी स्पष्ट केले. पक्ष किती जागा लढवणार, असे विचारले असता मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, असे ते म्हणाले.
सरकारला विरोधकांकडून जीएसटीवर सहकार्याची अपेक्षा
By admin | Updated: September 6, 2015 23:01 IST