ऑनलाइन लोकमत
गोध्रा, दि. ११ - गोध्रा कांडाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोषी तरुणाने पाकिस्तानमधील तरुणीशी निकाह केले आहे. इरफान पाडा असे या तरुणाचे नाव असून पाकिस्तानमधील लाहोर येथे राहणा-या मारिया या तरुणीशी त्याने लग्न केले असून मारिया माझ्यासाठी लकी असल्याचे इरफानचे म्हणणे आहे.
गोध्रा साबरमती एक्सप्रेसमधील जळीत कांडाप्रकरणी इरफान पाडा हा दोषी ठरला असून कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. मात्र इरफान सध्या जामीनावर तुरुंगातून बाहेर आला आहे. रविवारी इरफानने लाहोरमध्ये राहणा-या मारियाशी निकाह केले. इरफान हा यापूर्वी पेरॉलवर तुरुंगातून बाहेर आला असताना त्याची एका मित्रामुळे मारियाशी ओळख झाली. यानंतर मारिया व इरफानचे सूत जुळले व दोघांनीही निकाह करण्याचा निर्णय घेतला. मारियाचे नातेवाईक गोध्रामध्ये राहतात. विशेष म्हणजे पुन्हा तुरुंगात जाण्याची चिन्हे असतानाही इरफान व मारिया निकाहाच्या निर्णयावर ठाम होते. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबियांनीही पाठिंबा दिला. '१२ वर्ष तुरुंगात काढणे कठीण होते, पण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे' असे इरफान सांगतो. मारियाला भेटल्यावर १५ दिवसांमध्येच माझा जामीन मंजूर झाला होता. ती माझ्यासाठी 'लकी' असून आता मला न्याय मिळेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला. मारियाचा भाऊ मोहम्मद इस्माइल यानेही या दोघांना निकाहासाठी शुभेच्छा देत आता सर्व काही सुरळीत अशी प्रतिक्रिया दिली.