ऑनलाइन लोकमत
इलाहबाद, दि. १९ - छेडछाडीला विरोध करणा-या तरुणीची गोळी घालून हत्या करण्यात आली असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटा तालुक्यातील नगला गोपाल गावात संध्याकाळी एक तरुणी वहिनी सोबत नैसर्गिक विधी करता जात असताना भुवनेश व राजू या गाव गुंडांनी तिचा रस्ता अडवत अश्लील चाळे करण्यास सुरवात केली. या दोघांना विरोध करत ही तरुणी घरी पळून जाण्यात यशस्वी झाली. परंतू, राजू व भुवनेश यांनी इतर चौघांना सोबत घेऊन तरुणीच्या घरी जात तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता तिच्या वडिलांनी या गावगुंडांना विरोध केला. या झटापटी दरम्यान भुवनेशने गावठी पिस्तुलामधून झाडलेली गोळी पिडित तरुणीच्या मानेला लागली असता त्या तरुणीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथल्या डॉक्टरांनी आग्रा येथील रुग्णालयात त्वरीत हलवण्यास सांगितले. आग्रा येथे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या पीडित तरुणीने प्राण सोडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच राजू व त्याच्या अन्य सहका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.