पोलिसांच्या भूमिकेमुळे गंगाजमुना संतप्त
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
धावपळ : भिंत पडल्यामुळे महिला गंभीर जखमी
पोलिसांच्या भूमिकेमुळे गंगाजमुना संतप्त
धावपळ : भिंत पडल्यामुळे महिला गंभीर जखमी नागपूर : बहुचर्चित गंगाजमुनातील वस्तीत आज पोलिसांच्या कारवाईमुळे धावपळ उडाली. अशात बांधकाम सुरू असलेल्या भिंतीचा मलबा अंगावर पडल्यामुळे एक महिला गंभीर जखमी झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. गंगाजमुना वस्तीत परगावहून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलींना डांबून ठेवले जाते. त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या गैरप्रकाराला पोलिसांचीही अप्रत्यक्ष साथ आहे. पुण्यातील एका सामाजिक संस्थेने स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक मुलींची या नरकातून सुटका केली आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या दोन आठवड्यांपुर्वी पोलिसांनी या वस्तीतील वारांगनांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. अल्पवयीन मुलींकडून व्यवसाय करवून घ्यायचा नाही, रस्त्यावर उभे राहून हातवारे करायचे नाही, असे केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा नोटीसच येथे लावण्यात आली. त्याला दाद न दिल्यामुळे पोलिसांनी येथे छापामार मोहीम सुरू केली आहे. पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे. त्यामुळे वारांगनांंमध्ये असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर, आज दुपारी १२.३० च्या सुमारास पोलिसांनी येथे छापा घातला. उभ्या असलेल्या वारांगनांकडे पोलीस लाठ्या घेऊन धावल्यामुळे येथे धावपळ उडाली. तेवढ्यातच बांधकाम सुरू असलेली एक भिंत कोसळल्याने ४० वर्षीय महिला जबर जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.पोलिसांच्या नावे शिमगाया घटनेमुळे येथील वातावरण संतप्त झाले. वारांगनांनी पोलिसांच्या नावाने शिमगा केला. प्रौढ वारांगनांनी तर अक्षरश: थयथयाट केला. या वयात कोणते काम करायचे, कुठे राहायला जायचे, असा त्यांचा सवाल होता. ----