अहमदनगर: रस्त्यातील दोन तृतीयांश जागा सोडण्याच्या निर्णयात सूट देण्याची मागणी धुडकावून लावत न्यायालयाचे आदेश पाळावेच लागतील़ जो निर्णय दिला त्यानुसारच गणेशोत्सव साजरा करा, स्वयं शिस्त महत्वाची असून युवकांकडून प्रशासनाला मोठ्या अपेक्षा आहेत़ कोणत्या परिस्थितीत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा कठोर निर्णय घेतले जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सोमवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिला आहे़ जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली़ जिल्हाधिकारी अनिल कवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते़ यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे़ गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे़ गणेश मंडळांकडून सहकार्याची अपेक्षा आहे़ परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू केली जाईल़ कुणालाही घरी जावून परवानगी दिली जाणार नाही़ मंडप आणि डिजेबाबत न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, ते पाळणे बंधनकारक आहे़ नियमानुसारच उत्सव साजरा करा, प्रशासन तुमच्यासोबत आहे. मात्र दारू, जुगार, गैरवर्तन आणि डिजेचा गोंगाट, असे प्रकार आढळून आल्यास गय नाही, असा इशाराही त्रिपाठी यांनी यावेळी दिला़ मंडळांत असलेल्या स्पर्धेतून वाद निर्माण होतात़ वैयक्तिक वादाला धार्मिक स्वरुप दिले जाते़ तसे घडणार नाही, याची काळजी घ्यावी़ मिरवणुकीच्यावेळी डिजे लावू नयेत, कारण ७५ डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास पर्यावरण विभागाच्या कायद्यानुसार १ ते ५ लाखापर्यंत दंड अकारण्याची तरतूद आहे, असे त्रिपाठी यांनी सांगितले़ सध्या जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे़ सर्वांनाच दुष्काळाची चिंता आहे, अशा परिस्थितीत गणेशोत्सव साजरा होत असून, हा मोठा विरोधाभास आहे़ मंडळांकडे संघटित शक्ती आहे, या शक्तीचा वापर सकारात्मकतेसाठी करणे शक्य आहे, ते करण्याची मानसिकता हवी़ उत्सव हा मानवी कल्याणासाठी असून, एक नवा पायंडा आपण पाडावा, अशी अपेक्षा कवडे यांनी यावेळी व्यक्त केली़ बाळासाहेब पवार, ॲड़ शिवाजी कराळे, निलिमा गायकवाड, उबेद शेख, अनिल गट्टाणी आदिंनी सूचना केल्या़
न्यायालयाच्या लक्ष्मणरेषेतच गणेशोत्सव
By admin | Updated: September 1, 2015 16:25 IST