ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ६ - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मानहानीप्रकरणी दिल्ली कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित केले आहे. भारतीय दंड संहितेतील कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले असून यात दोषी ठरल्यास केजरीवाल यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जानेवारीमध्ये नितीन गडकरी सर्वात भ्रष्ट असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी नितीन गडकरी यांनी केजरीवालांविरोधात मानहानी केल्याची याचिका दाखल केली होती. या फौजदारी याचिकेसंदर्भात केजरीवाल यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने केजरीवाल यांना सात दिवस न्यायालयीन कोठडीत काढावी लागली होती. शुक्रवारी याप्रकरणाची सुनावणी झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अरविंद केजरीवाल हे दोन्ही नेते शुक्रवारी कोर्टात हजर होते. कोर्टाने दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेत प्रकरणावर तोडगा काढण्याचा पर्याय सूचवला होता. मात्र केजरीवाल यांनी माझ्याकडे गडकरींविरोधात पुरावे असल्याने मी माझे आरोप मागे घेणार नाही असे न्यायालयासमोर स्पष्ट केले. तर केजरीवाल आरोप मागे घेणार नसतील तर आम्ही याचिका घेणार नाही. ही सुनावणी सुरु राहू द्यावी असे गडकरींच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
दोन्ही पक्षांनी आरोप मागे न घेण्याची ठाम भूमिका घेतल्याने आता केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची नियमीत सुनावणी होईल. यात केजरीवाल यांना त्यांनी केलेले आरोप सिध्द करावे लागतील. यात ते अपयशी ठरल्यास न्यायालय त्यांना शिक्षा ठोठावेल.