दिगंबरचे भवितव्य आज ठरणार
By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST
एका बाजूने पोलीस कोठडीत असलेल्या चर्चिल आलेमाव यांच्या घरावर छापा टाकून त्यांचा जामीन मिळविण्याचा मार्ग खडतर करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे, तर दुसर्या बाजूने बुधवारी होणार्या सुनावणीत माजी मुख्यमंत्री आणि जैका प्रकरणातील मुख्य संशयित दिगंबर कामत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज निष्फळ ठरवून त्यांना पोलीस कोठडीत घेण्याच्या पवित्र्यात पोलीस आहेत.
दिगंबरचे भवितव्य आज ठरणार
एका बाजूने पोलीस कोठडीत असलेल्या चर्चिल आलेमाव यांच्या घरावर छापा टाकून त्यांचा जामीन मिळविण्याचा मार्ग खडतर करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे, तर दुसर्या बाजूने बुधवारी होणार्या सुनावणीत माजी मुख्यमंत्री आणि जैका प्रकरणातील मुख्य संशयित दिगंबर कामत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज निष्फळ ठरवून त्यांना पोलीस कोठडीत घेण्याच्या पवित्र्यात पोलीस आहेत.बुधवारच्या न्यायालयीन लढाईसाठी कामत यांच्यातर्फे सुरेंद्र देसाई हे युक्तिवाद करणार आहेत, तर क्राईम ब्रँचतर्फे जी. डी. कीतर्नी हे युक्तिवाद करणार आहेत. पोलिसांकडे कामत यांच्या विरोधात नोंदविण्यात आलेल्या जबानींशिवाय कोणतेही पुरावे नसल्याचा दावा त्यांच्या वकिलातर्फे केला जाणार, हे स्पष्ट आहे. तसेच पोलीसांना हवी असलेली आणि कामत व चर्चिल यांचे शेरे असलेली कथित फाईल अद्याप पोलिसांना सापडली नसल्याचाही ते फायदा उठविण्याचा प्रयत्न करतील. दुसर्या बाजूने पोलिसांतर्फे आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या 5 जणांचे जबाब हाच ठोस पुरावा असल्याचा युक्तिवाद केला जाईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लाच प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी पुरावा जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांचा जबाब. हा पोलिसांचा हुकमी एक्का असल्याचे सध्या तरी दिसत आहे. नेमका हाच पुरावा कामत यांना भोवण्याचीही शक्यता आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला जाईल, असा पूर्ण विश्वास क्राईम ब्रँचला आहे. कामत यांचा अर्ज फेटाळल्यास त्यांना उच्च न्यायलयात जायला वेळ दिला जाईल की, त्यांना अटक करण्याची त्यांना संधी मिळेल, याबद्दलच उत्सुकता वाढली आहे. तसेच बुधवारी युक्तिवाद पूर्ण होऊन गुरुवारी निवाडा होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.कामतना पुन्हा समन्स; पोलिसांचा मास्टर स्ट्रोकदिगंबर कामत यांना क्राईम ब्रँचकडून बुधवारी दुपारी 12 वाजता क्राईम ब्रँचच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे. दुपारी 2.30 नंतर त्यांच्या अटकपूर्ण जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. अशा वेळी कामत हे बुधवारी 12 वाजता चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, तर ते चौकशीसाठी सहकार्य करीत नसल्याचा नवीन पुरावा म्हणून पोलीस न्यायालयाच्या निदर्शनास आणून देतील आणि ते हजर राहिले, तर त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यास त्यांना अटक करतील. त्यामुळे कामत यांना व्यवस्थित कात्रीत पकडण्याची धूर्त चाल क्राईम ब्रँचकडून खेळण्यात आली आहे.