ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - माजी रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली न्यायालयाने सोमवारी चौघा आरोपींना दोषी ठरवले आहे. या चौघांच्या शिक्षेवर १५ डिसेंबररोजी निर्णय दिला जाणार असून तब्बल ४० वर्षांनी मिश्रा कुटुंबियांना न्याय मिळाला आहे.
२ जानेवारी १९७५ रोजी बिहारमधील समस्तीपूर स्टेशनवर एका कार्यक्रमासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री ललित मिश्रा आले होते. या दरम्यान स्टेशनवर स्फोट झाला व यात मिश्रा यांचा मृत्यू झाला. याप्रकरणात तब्बल २०० हून अधिक साक्षीदारांचा जबाब घेण्यात आला. याप्रकरणी वकिल रंजन द्विवेदी, संतोषानंद अवधूत, सुदेवानंद अवधूत आणि गोपाल असे चार आरोपी होते. तर एका आरोपीचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला होता. या सर्वांविरोधात गेल्या ४० वर्षांपासून खटला सुरु होता. न्यायालयीन प्रक्रियेत होणा-या विलंबाचे कारण देत तुरुंगातून सुटका करावी अशी मागणी करत या चौघांनीही वरिष्ठ कोर्टाचे दार ठोठावले होते. मात्र २०१२ मध्ये कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर सोमवारी दिल्लीतील कडकडडुमा कोर्टाने सीबीआय व आरोपींच्या वकिलांच्या युक्तीवाद ऐकून घेतल्यावर या चौघांना आयपीसीतील कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवले.