वासुदेव पागी, पणजीगोव्यात विदेशी पर्यटकांना लुटण्याच्या प्रकाराविरुद्ध एकीकडे गोवा विधानसभेतही चिंता व्यक्त झालेली असताना आता विदेशी पर्यटकांकडूनच स्थानिक व्यावसायिकांना गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत.भाड्याने दुचाकी वापरण्यास घेऊन पैसे न देता ती कोठेतरी टाकून पळ काढण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. राज्यात पर्यटक वाढल्यानंतर त्यांची व्यावसायिकांकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांत नोंदविल्या जात होत्या. मात्र आता पर्यटकांची संख्या रोडावल्यावर व्यावसायिकांत स्पर्धा वाढली असून याचा गैरफायदा घेऊन पर्यटकांकडूनच व्यावसायिकांची फसवणूक केली जात आहे.पणजी व म्हापसा पोलीस उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार १५ ते ३० एप्रिल या काळात पर्वरी, पणजी, जुने गोवा, आगशी, म्हापसा, कळंगुट, बागा, हणजूण, साळगाव येथे २८ पेक्षा अधिक दुचाकी चोरीचे एफआयआर नोंदविले गेले. यातील बहुतेक सर्वच गुन्हे अनोळखींवर नोंदविले आहेत. हा प्रकार व्यावसायिकांकडून पर्यटक घेऊन गेलेल्या वाहनांची असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले की, भाड्याने दिलेली वाहने परत न केल्याच्या अनेक घटना घडतात; परंतु तशी तक्रार व्यावसायिक करत नाहीत. काही दिवसांनी कुठेतरी पार्क केलेल्या स्थितीत दुचाकी आढळल्यानंतर प्रकरणाचा पर्दाफाश होतो, असे त्यांनी सांगितले.
विदेशी पर्यटकांकडून गोवेकरांची फसवणूक !
By admin | Updated: May 5, 2015 01:15 IST