काटकसरीचे नियम काटेकोरपणे पाळा
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
कॅबिनेट सचिवांचे नोकरशहांना आदेश
काटकसरीचे नियम काटेकोरपणे पाळा
कॅबिनेट सचिवांचे नोकरशहांना आदेशनवी दिल्ली- खर्चाला लगाम घालण्यासाठी मंत्रिमंडळ सचिवांनी सर्व मंत्रालयांमधील वरिष्ठ नोकरशहांना काटकसरीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये संमेलने अथवा बैठका आयोजित न करण्याचे आदेश दिले आहेत.सर्व मंत्रालये आणि विभागांना नुकतेच यासंदर्भात एक पत्र पाठविण्यात आले आहे. पंचतारांकित हॉटेल्सचा वापर फक्त अधिकारी स्तरावरील महत्त्वाच्या द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय बैठकांसाठीच केला पाहिजे,असे मंत्रिमंडळ सचिव अजित सेठ यांनी पाठविलेल्या या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारने काटकसर मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार नोकरशहांचे प्रथम श्रेणीतील विमान प्रवास, पंचतारांकित हॉटेलमधील बैठका आणि कार खरेदींवर कात्री लावण्यात आली आहे. सरकारने नवीन नियुक्त्यांवरही निर्बंध घातले होते. योजनेतर खर्चामध्ये १० टक्के कपातीचे लक्ष्य सरकारने ठेवले होते. वित्तीय तूट ४.१ टक्क्यांवर आणण्यासाठी या उपाययोजना करण्यात येत आहेत. काटकसरीच्या नियमांचे पालन करण्याची पहिली जबाबदारी ही सचिवांची आहे. (वृत्तसंस्था)