कोलकाता : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चार महिन्यांपूर्वी तपासाची सुरुवात करणाऱ्या सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेने कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यातील आपले पहिले आरोपपत्र बुधवारी दाखल केले.२५ पानांच्या या आरोपपत्रामध्ये शारदा समूहाचा प्रमुख सुदीप्तो सेन, त्याची सहकारी देवयानी मुखर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित राज्यसभा सदस्य कुणाल घोष या तिघांसह चार कंपन्यांना आरोपी बनविण्यात आले आहे, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली. सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने आपल्या वकिलासह सत्र न्यायालयाच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात येऊन हे आरोपपत्र दाखल केले.सीबीआयने भारतीय दंड संहितेच्या कलम १२० बी, ४०९ आणि ४२० तसेच बक्षीस, चिट, अॅण्ड मनी सर्क्युलेशन स्कीम्स (बॅनिंग) अॅक्ट १९७८ अन्वये हे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी अन्य आरोपींची भूमिका आणि आर्थिक व्यवहाराची माहिती जाणून घेण्यासाठी सीबीआय आपला तपास सुरूच ठेवणार आहे. ज्या चार कंपन्यांना आरोपी बनविण्यात आले आहे, त्यात शारदा टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स, शारदा गार्डन्स, शारदा रियाल्टी, कुणाल घोष यांच्या मालकीची शारदा कन्स्ट्रक्शन्स स्ट्रॅटेजिक मीडिया या कंपनीचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
शारदा घोटाळ्यात पहिले आरोपपत्र
By admin | Updated: October 23, 2014 04:42 IST