जम्मू : चार सशस्त्र लोक दिसल्याचे कळल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गालगतच्या सांबा शहरात गुरुवारी शोधमोहीम सुरू केली. साध्या वेशातील चार सशस्त्र लोक सांबाच्या मुख्य चौकातून सिडको औद्योगिक वसाहतीकडे गेल्याची माहिती काही मजुरांनी पोलिसांना दिली. सिडको औद्योगिक वसाहत बसंतर नदी पात्राजवळ आहे. ही नदी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात जाते. दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी प्रामुख्याने याच नदीमार्गाचा वापर करतात. पहाटे दिसलेल्या चार सशस्त्र लोकांच्या हालचाली संशयास्पद होत्या, असे कळल्यानंतर महामार्गालगतच्या सांबा शहरात शोधमोहीम सुरू करण्यात आली, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, आतापर्यंत काहीही हाती लागले नाही. (वृत्तसंस्था)
सशस्त्र लोक दिसल्याने शोधमोहीम
By admin | Updated: June 16, 2017 03:45 IST