चेन्नई : अण्णा द्रमुकच्या जनरल कौन्सिलच्या गुरुवारच्या बैठकीत शशीकला नटराजन यांना पक्षाच्या सर्वेसर्वा म्हणजेच सरचिटणीस करण्याच्या ठरावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर मुख्यमंत्री पनीरसेल्वम व पक्षाच्या इतर नेत्यांनी शशीकला यांची भेट घेतली. त्यांना या निर्णयाची माहिती देताच, शशीकला यांना भरून आले आणि रडू फुटले. काही वेळेत त्या हिरव्या रंगाची साडी नेसून पोस गार्डन या जयललितांच्या बंगल्याबहेर आल्या, तेव्हा अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.जयललिता या नेहमी हिरव्या रंगाची साडी नेसत. तशीच साडी शशीकला नेसून येताच, कार्यकर्त्यांनी चिनम्मा चिरायू होवोत, (जयललिता यांना अम्मा म्हटले जात असे.) अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन करून, आपण हे पद अतिशय विनम्रपणे स्वीकारत आहोत, असे जाहीर केले. अर्थात ते पद त्यांनाच मिळणार, ही काळ्या दगडावरील रेघ होती. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी तसे घोषितच केले होते. अण्णा द्रमुकच्या घटनेप्रमाणे शशीकला यांना हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्त केले असून, नंतर त्या नियमित सरचिटणीस होतील. शशीकला यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्याचा ठराव ई मधुसुदनन, ओ. पनीरसेल्वम आणि एडापडी पलानीस्वामी यांच्या अध्यक्ष मंडळाने जनरल कौन्सिलच्या बैठकीत मांडला. तो एकमताने मंजूर झाला.शशीकला नटराजन यांच्याकडे आता पक्षाची सूत्रे आली असून, त्या जयललिता यांच्याच बंगल्यात यापुढे वास्तव्य करणार, हेही स्पष्ट झाले आहे. जयललिता यांच्या अन्य नातेवाईकांना त्यांनी या बंगल्यात प्रवेशच दिलेला नाही. (वृत्तसंस्था)
अखेर अद्रमुकची सूत्रे चिनम्मांकडे
By admin | Updated: December 30, 2016 01:46 IST