फायनल सुधारित -दिल्लीच्या उपमुख्यमंत्रिपदी मनीष सिसोदिया
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
आपच्या मंत्रिमंडळात चार नवे चेहरे : राखी बिर्ला, सोमनाथ भारतींना डच्चू?
फायनल सुधारित -दिल्लीच्या उपमुख्यमंत्रिपदी मनीष सिसोदिया
आपच्या मंत्रिमंडळात चार नवे चेहरे : राखी बिर्ला, सोमनाथ भारतींना डच्चू?नवी दिल्ली- दिल्लीत उद्या १४ फेब्रुवारीला सत्तारूढ होत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मनीष सिसोदिया यांचे उपमुख्यमंत्रिपद निश्चित झाले आहे. याशिवाय यावेळच्या या सात सदस्यीय मंत्रिमंडळात चार नवे चेहरेही दिसण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ सदस्यांची यादी तयार झाल्यानंतर ती नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. दरम्यान ऐतिहासिक रामलीला मैदानावर होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. तीन वर्षांपूर्वी याच मैदानावरून भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा शंखनाद झाला होता. आम आदमी पार्टीच्या सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना वगळता आपच्या यापूर्वीच्या मंत्रिमंडळातील सदस्य राखी बिर्ला, सौरभ भारद्वाज, सोमनाथ भारती आणि गिरीश सोनी यांना मात्र डच्चू मिळणार असल्याचे वृत्त आहे. मध्यरात्रीच्या धाडसत्र वादातून बाहेर पडेपर्यंत भारती यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणे कठीण आहे. तर राखी बिर्ला आणि गिरीश सोनी यांच्यावर संघटनेची जबाबदारी दिली जाईल. पक्षाने यावेळी जितेंद्र तोमर (त्रिनगर), संदीप कुमार (सुल्तानपुरी माजरा) आणि असिम अहमद खान (मतिया महल) यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे ठरविले आहे. खान यांच्या रूपात अल्पसंख्यकांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळेल. नवीन सरकारमध्ये बहुदा महिला सदस्य असणार नाही. दुपारी कारवरनगरचे आमदार कपिल मिश्रा यांचेही नाव चर्चेत होते. परंतु नंतर ते मागे पडले आणि पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचे ज्येष्ठ सदस्य व बाबरपूरचे आमदार गोपाल राय यांचे नाव समाविष्ट झाले. सिसोदिया यापूर्वीच्या आप सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते आणि शिक्षण, शहर विकास, सार्वजनिक बांधकाम आदी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली होती. शाकुर बस्ती येथून दोनदा निवडून आलेले आणि यापूर्वीच्या सरकारमध्ये आरोग्य विभागाची धुरा सांभाळणारे जैन यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात सदस्य निवडीवरून पक्षात चर्चेचे गुऱ्हाळ सतत सुरू आहे. परंतु जोपर्यंत औपचारिक घोषणा होत नाही तोपर्यंत याबाबत काही वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही, असे सिसोदिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सूत्रांच्या सांगण्यानुसार बुधवारी रात्री केजरीवाल यांच्या कौशम्बी येथील निवासस्थानी झालेल्या आपच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत सिसोदिया यांना उपमुख्यमंत्री बनविण्याबाबत निर्णय झाला. केजरीवाल यांना राष्ट्रीय स्तरावर पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून सिसोदिया यांना ही जबाबदारी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय विधानसभा अध्यक्षपदी शहाद्राचे आमदार रामनिवास गोयल आणि उपाध्यक्षपदी शालिमार बाग मतदारसंघातून विजयी झालेल्या वंदना कुमारी यांच्या निवडीचाही निर्णय या बैठकीत झाल्याचे समजते. वंदनाकुमारी या आप महिला शाखेचेही नेतृत्व करतात. (वृत्तसंस्था)असे मंत्रिमंडळमुख्यमंत्री- अरविंद केजरीवालउपमुख्यमंत्री- मनीष सिसोदियासत्येंद्र जैनजितेंद्र तोमरसंदीपकुमारअसिम अहमद खानगोपाल राय७० सूत्रीवर काम सुरूदरम्यान आपच्या ७० सूत्री जाहीरनाम्याच्या आराखड्यावर विविध विभागांनी कामास प्रारंभ केला आहे. दिल्ली सरकारमधील अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्यासमक्ष योजनांची रूपरेषा सादर करण्यासाठी सर्व संबंधित विभाग तयारी करीत आहे. जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी कामाला लागा असे निर्देश केजरीवाल यांनी बुधवारी मुख्य सचिव डी.एम. सपोलिया यांना दिले होते.