ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - बॉलीवूडमध्ये बोल्ड सीन्समुळे चर्चेत असणा-या मल्लिका शेरावतला आता राजकारणात येण्याचे वेध लागले आहेत. मी राजकारणात यायला तयार आहे. मात्र त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला परराष्ट्र मंत्री बनवावं अशी अटच मल्लिकाने ठेवली आहे.
अभिनेत्री मल्लिका शेरावतची प्रमुख भूमिका असलेला डर्टी पॉलिटीक्स हा सिनेमा येत्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भंवरी देवी सेक्स स्कँडलवर आधारित असून मल्लिकाच्या बोल्ड सीन्समुळे आत्तापासूनच हा चित्रपट चर्चेत आला आहे. या सिनेमाच्या एका गाण्याचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या निमित्त पत्रकारांशी संवाद साधताना मल्लिकाने राजकारणात यायची इच्छा बोलून दाखवली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला परराष्ट्रमंत्रीपद द्यावं, मी भारताचे सर्व देशांशी असलेले संबंध सुधारीनच त्यासोबत पॉ़लिटिक्सलाही 'क्लीन' करीन असे मल्लिकाने म्हटले आहे.