नवी दिल्ली : करदात्यांच्या पैशातून प्रकाशित होणाऱ्या शासकीय जाहिरातींमध्ये राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांच्या वापरासंदर्भातील धोरण लवकरात लवकर स्पष्ट करा, असे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) केंद्र सरकारला दिले आहेत़आरटीआय कार्यकर्ता सुभाष अग्रवाल यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती़ शासकीय जाहिरातीत दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे छायाचित्र कुठल्या आधारावर जारी करण्यात आले, अशी माहिती त्यांनी विचारली होती़ या याचिकेवर सुनावणी करताना आयोगाने उपरोक्त निर्देश दिले़ माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ अंतर्गत राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या जाहिरातींबाबतच्या धोरणांचा खुलासा करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे माहिती आयुक्त श्रीधर आर्चायुलू म्हणाले़ हे धोरण कधीपर्यंत जारी करणार, असा सवालही त्यांनी सरकारला केला़दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असतानाच दिल्लीच्या मुख्य सचिवांनाही सीआयसीने माहिती सादर करण्यास सांगितले आहे़ राजकीय प्रशासकांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून सुरू असलेला प्रचार रोखण्याच्या उद्देशाने दिल्ली लोकायुक्तांनी सुचवलेल्या शिफारशी लागू करण्याच्या दिशेने काय पावले उचलली, अशी विचारणा आयुक्तांनी त्यांना केली आहे़(लोकमत न्यूज नेटवर्क)
शासकीय जाहिरातींबाबत नेत्यांच्या छायाचित्रांबाबतचे धोरण स्पष्ट करा
By admin | Updated: January 19, 2015 02:40 IST