ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले असून मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलने 'आप'ला कौल दिला आहे. दिल्लीतील ७० जागांपैकी आम आदमी पक्ष काठावर बहुमत मिळवत सत्ता स्थापन करेल असे भाकीत एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी शनिवारी मतदान झाले आहे. आम आदमी पक्षासारख्या नवख्या पक्षाने नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर तगडे आव्हान निर्माण केले. मोदी व केजरीवाल यांच्यातील थेट लढत टाळण्यासाठी भाजपाने आयत्यावेळी किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करत केजरीवाल विरुद्ध बेदी असे चित्र निर्माण केले. किरण बेदींच्या प्रवेशामुळे भाजपातील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी होती. मात्र या नाराजीकडे दुर्लक्ष करत भाजपा नेतृत्वाने किरण बेदींना पाठिंबा दिला. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने नियोजनबद्ध प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणूक लढवत असली तरी खरी लढत आप विरुद्ध भाजपा यांच्यात आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या कामकाजाची परीक्षा निवडणुकीद्वारे घेतली जाणार आहे.
शनिवारी संध्याकाळी मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये आपचे पारडे जड दाखवण्यात आले आहे. तर भाजपाला यंदा दिल्ली पहिल्या क्रमांकावरुन दुस-या स्थानावर समाधान मानावे लागेल. काँग्रेस तिस-या स्थानावर असेल असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर भाजपासाठी हा मोठा हादरा असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी सांगितले.
एक्झिट पोलचा अंदाज (दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागा)
आप | भाजपा | काँग्रेस | अन्य | |
एबीपी निल्सन | ३९ | २८ | ०३ | ० |
सी व्होटर | ३१-३९ | २७-३५ | २- ४ | ० |
इंडिया टुडे | ३५-३८ | २३-२९ | ३-५ | ०-२ |