नवी दिल्ली : बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह देशभरात गेल्या ६२ वर्षांत पुराच्या तडाख्यात दरवर्षी सरासरी २१३० लोकांचा मृत्यू झाला, तसेच १.२ लाख पशुधनाचे आणि सरासरी ८२.०८ लाख हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले.माहिती अधिकारातहत जलसंसाधन, नदी विकास मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार १९५३ ते २०१२ या दरम्यान विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत सरासरी १,४९९ कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले, तसेच १४ लाख घरांची पडझड झाली. पुरामुळे सरासरी ४६.४६ लाख हेक्टर शेतीतील पिके हातची गेली. त्यामुळे सरासरी ७३९ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला. या सहा दशकांत सार्वजनिक सेवांचेही २५८६ कोटी रुपयांचे नुकसान झाले.१९५३ ते २०१२ दरम्यान महाराष्ट्रात पुराच्या तडाख्यात सरासरी ८९ लोकांचा मृत्यू झाला, तर ५७ लाख हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याने ६ कोटी रुपयांचे नुकसान झाले.यावर्षी बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह काही राज्यांतील पूरस्थिती गंभीर आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या २५ आॅगस्टच्या आकडेवारीनुसार ६ कोटी ६३ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला. या राज्यातील एकूण १२६ जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून, पुरात ६०० लोकांचा बळी गेला, तसेच ४२ लाख हेक्टवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले.यावर्षी उत्तर प्रदेशातील २९ जिल्हे पूरग्रस्त असून, ५२ लोक मृत्युमुखी पडले आहेत, तसेच एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे. बिहारमधील २४ पूरग्रस्त जिल्ह्यात १२७ जणांचा बळी गेला आहे. मध्यप्रदेशातील २६ पूरग्रस्त जिल्ह्यांत शंभराहून अधिक लोक ठार झाले असून, ४० हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
पुराच्या तडाख्यात दरवर्षी २१३० लोकांचा मृत्यूृ
By admin | Updated: September 6, 2016 04:14 IST