कोलकाता : भारतात गत दोन दशकांत बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे़ पण देशातून या कूप्रथेचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी आणखी ५० वर्षे लागतील, असे कटू वास्तव युनिसेफने (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स इंटरनॅशनल इमर्जन्सी फंड) बोलून दाखवले आहे़मंगळवारी येथे भारतातील युनिसेफच्या बाल सुरक्षा तज्ज्ञ डोरा गियुस्टी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना भारताच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. देशातील बालविवाह आणि ते रोखण्यासाठीचे प्रयत्न चिंताजनक असल्याचे त्या म्हणाल्या़ गत दोन दशकांत बालविवाहाचे प्रमाण प्रतिवर्ष एक टक्क्याने कमी झाले आहे. पण ते शून्यावर येण्यासाठी आणखी ५० वर्षे जावी लागतील. या दीर्घकाळात लाखो मुली बालविवाहाच्या कूप्रथेच्या शिकार ठरलेल्या असतील, असे त्या म्हणाल्या. यासाठी त्यांनी एका पाहणी निष्कर्षाचा दाखलाही दिला. त्या म्हणाल्या की, २० ते २४ वर्षे वयोगटातील महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले असता, यापैकी पाचपैकी दोन महिलांनी त्यांचा बालविवाह झाल्याचे सांगितले. भारतात अद्यापही काही समूहांमध्ये ही प्रथा जिवंत आहे. दुर्दैवाने ती रोखण्याचा प्रयत्न अतिशय संथ सुरू आहेत. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, बालविवाहात भारताचे स्थान सहावे आहे.(वृत्तसंस्था)
बालविवाह प्रथेचा अंत ५० वर्षे दूर
By admin | Updated: August 27, 2014 01:01 IST