शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक

By admin | Updated: September 13, 2015 02:44 IST

बिहारच्या समरांगणात राजकीय लढाईचा शंखनाद दशदिशांनी दुमदुमतो आहे. देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याची क्षमता या लक्षवेधी संग्रामात आहे. वस्तुत: बिहारमधे मोदी

- सुरेश भटेवरा (लेखक लोकमतचे राजकीय संपादक आहेत.)

बिहारच्या समरांगणात राजकीय लढाईचा शंखनाद दशदिशांनी दुमदुमतो आहे. देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याची क्षमता या लक्षवेधी संग्रामात आहे. वस्तुत: बिहारमधे मोदी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नाहीत, तरीही वरकरणी मुख्यमंत्री नितीशकुमार विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी असे या रंगतदार लढतीचे चित्र दिसते आहे. एकप्रकारे मोदी सरकारच्या कारकिर्दीच्या सार्वमताचे स्वरूपच या निवडणुकीला प्राप्त झाले आहे. साहजिकच भाजपाची सारी प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. गेल्या वर्षभरात नितीशकुमारांच्या लोकप्रियतेला काहीसे ग्रहण लागले. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाला. मुख्यमंत्रिपदी त्यांनीच बसवलेले जीतनराम मांझी बंडखोरी करून सोडून गेले. तरीही नितीशकुमारांशी स्पर्धा करू शकेल असा सर्वमान्य चेहरा आज भाजपाकडे राज्यात नाही. पक्षात नेतेपदासाठी स्पर्धा आहे. मित्रपक्षांच्या नेत्यांनीही निवडणुकीपूर्वीच अडवणुकीचे रंग दाखवायला सुरूवात केली आहे. साहजिकच भाजपाने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा दावेदार घोषित केलेला नाही. तरीही राजकीयदृष्ट्या दोन्ही बाजू तुल्यबळ आहेत.जाती जमातींचे अंकगणित, धनशक्ती, मनगटशक्ती, अशा विविध स्तरांवर उभय पक्षांनी बारकाईने कलाकुसर सुरू केली आहे. निवडणुकीची हवा आज कोणाच्याही बाजूने झुकलेली नाही. म्हणूनच यंदाची लढाई तशी सोपी नाही. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना अभूतपूर्व यश प्राप्त झाले याचे महत्वाचे कारण संयुक्त राष्ट्र संघाचे माजी अधिकारी प्रशांत किशोर यांच्या ‘सिटीझन्स फॉर अकौंटेबल गव्हर्नन्स’ (सीएजी) च्या हाती प्रचारयंत्रणेच्या रणनीतीची सारी सूत्रे त्यांनी सोपवली होती. प्रशांत यांचा मुक्काम या काळात गांधीनगरला मोदींच्या निवासस्थानीच होता. मोदींनी कुठे काय बोलावे, यासह प्रचाराचे सारे तपशील सीएजीचा ताफा ठरवीत असे. भाजपाचे तमाम नेते मुकाटपणे त्यांचे आदेश मानायचे. निवडणुकीत ‘चाय पे चर्चा’, ‘थ्री डी होलोग्रॅम’ सारखे अभिनव प्रयोग करून सीएजीने साऱ्या देशात मोदींची हवा तयार केली. आधुनिक तंत्रज्ञान, गोळा केलेला डेटा इत्यादीच्या आधारे नेत्याचे ब्रँडिंग, मार्केटिंग करण्यात प्रशांत प्रभावी ठरले. यंदा हेच प्रशांत किशोर बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमारांच्या प्रचारयंत्रणेचे सारथ्य करीत आहेत. मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ च्या धर्तीवर बिहारमधे ‘पर्चा पे चर्चा’ (प्रचार पत्रावर चर्चा) संपन्न झाली. ‘हर हर मोदी घर घर मोदी’ ला पर्यायी ठरणारा ‘हर घर दस्तक’(घरोघर प्रचाराचा कार्यक्रम) जद (यु) कार्यकर्त्यांनी कसोशीने राबवला. एकीकडे ४00 ट्रक्सवर बसवलेल्या भव्य एलईडी मॉनिटर्सच्या माध्यमातून प्रशांतच्या ताफ्याने, ४0 हजार खेड्यातल्या जनतेपर्यंत नितीशकुमारांना पोहोचवले. दुसरीकडे अमित शहांनी जीपीएस यंत्रणेचा वापर करीत ४00 प्रचाररथ मैदानात उतरवलेत. राजकीय रणांगणात इतकी सुसज्ज आणि प्रेक्षणीय लढाई बिहारची जनता प्रथमच पहाते आहे. मोदींना केंद्रीय सत्तेपर्यंत पोहोचवणारे प्रशांत किशोर आणि लोकसभेच्या विजयाचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट अमित शहा यंदा परस्परांसमोर उभे आहेत. राजकीयदृष्ट्या बिहार अतिशय जागरूक आहे. इथल्या प्रचारात भू संपादन कायदा, घर वापसी, जीएसटी, आर्थिक सुधारणा, इत्यादी मुद्दे फारसे प्रभावी नाहीत. मुझफ्फरपूरच्या प्रचारसभेत उत्साहाच्या भरात मोदींनी नितीशकुमारांच्या डीएनएचा उल्लेख केला. नितीशकुमारांनी त्याला बिहारी अस्मितेचा प्रश्न बनवले. दरम्यान निवडणूक जाहीर झाली. राजकीय आतषजीचा फड रंगू लागला. आपल्या मिस्कील शैलीमुळे लालूप्रसाद प्रचार सभांमधे नितीशकुमारांपेक्षा काकणभर सरसच ठरत आहेत. तरीही नेहमीप्रमाणे जाती जमातींचे अंकगणित हाच खरा कळीचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीतही आहे. बिहारमधे जातवार मतांच्या टक्केवारीची विभागणी पुढीलप्रमाणे आहे. यादव १४%,कोईरी ५%, कुर्मी ४%, मुस्लिम १५% यातले बहुसंख्य मतदार आज नितीशकुमार, लालूूप्रसाद व काँग्रेस आघाडीसोबत आहेत. काँग्रेसकडे विशिष्ट जातीचे गठ्ठा मतदान नाही, मात्र या पक्षाला ६ ते ७% संमिश्र मतदान मिळते. या सर्वांची एकत्र टक्केवारी ४४ ते ४५ आहे. दुसरीकडे सवर्ण ब्र्राम्हण + ठाकुर + भूमीहार १८%, बनिया ७%, तर पासवानांच्या लोजपकडे ६% दलित, उपेंद्र कुशवाहांकडे ८% त्यांच्या जातीचे मतदार आहेत. सर्वांची एकत्र टक्केवारी ३९ टक्के आहे. याखेरीज महादलित १0% व अति मागास जातींचे मतदान २१% आहे, जे या निवडणुकीत खऱ्या अर्थाने निर्णायक ठरणार आहे. आपल्या बाजूने हे मतदान वळवण्यासाठी जनता दल व भाजपा आघाडीने सारी शक्ती पणाला लावली आहे. समाजवादी, राष्ट्रवादी आणि बसपा मोठया संख्येने आपले उमेदवार उभे करीत असले तरी या लढाईत तिघांचाही फारसा प्रभाव नाही. फार तर ‘वोट कटवा’ची भूमिका ते वठवू शकतात. आपल्या गोटात बंडखोर जीतनराम मांझींना दाखल करण्याचा कितपत लाभ भाजपाला होतो, याविषयी आज संदिग्धता आहे. जाती जमातींचे अंकगणित नितीशकुमारांच्या आघाडीच्या बाजूने आहे तथापि भाजपाने कोणत्याही स्थितीत निवडणूक जिंकायचीच असा निर्धार केला आहे. साहजिकच धनशक्तीचा मुबलक वापर निवडणुकीत होणार आहे. लालूप्रसादांच्या पाठिशी यादव मतदार भक्कमपणे उभे आहेत. नितीशकुमारांच्या उमेदवारांकडे त्यांची मते किती प्रमाणात वळतात, हा प्रश्न तूर्त अनुत्तरित आहे. याखेरीज दहा वर्षांच्या अँटी इनकमन्सीचा त्रासही सत्ताधारी पक्षाला होणारच आहे. बिहारमधे मोदींच्या सभांना प्रतिसाद मिळतो आहे मात्र गतवर्षीची त्यांची लोकप्रियता बऱ्यापैकी ओसरली आहे.बिहारची निवडणूक समजा चुकून मोदी हरले तर पुढल्यावर्षी त्याचे पडसाद उत्तरप्रदेशात उमटलेले दिसतील. ही दोन मोठी राज्ये भाजपाच्या हातून निसटली तर उर्वरित कालखंडात संसदेत आणि संसदेबाहेर मोदी सरकारला प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागेल. नितीशकुमारच नव्हे तर भाजपाच्या दृष्टीनेही ही अग्निपरीक्षाच आहे.