अहमदाबाद : सहा वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात असलेल्या तरुण मुलाची हत्या झाली. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील आपल्या गावातील वरच्या जातीच्या लोकांनीच या मुलाची हत्या केल्याचा या वृद्ध दाम्पत्याचा आरोप आहे. स्थानिक न्यायालयाने यातील आरोपींची पुराव्याअभावी सुटका केल्याने आता हे दाम्पत्य गांधीनगरात बेमुदत उपोषणाला बसले आहे.या दाम्पत्याचा मुुलगा दिनेश राठौड हा भारतीय सैन्यात जवान होता. २०१० मध्ये त्याची हत्या करण्यात आली असा त्यांचा आरोप आहे. सुरेंद्रनगरच्या कराडी गावातील हे वृद्ध दलित दाम्पत्य जहाभाई राठौड (६६) आणि त्यांची पत्नी जेठीबेन (६५) दोन आठवड्यापासून येथे सत्याग्रह छावणीत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी या दाम्पत्याने केली आहे. दलित अधिकार संघटना ‘प्रतिरोध’चे संयोजक राजूभाई सोळंकी यांनी सांगितले की, दिनेशला सैन्यात कामगिरीसाठी चार पुरस्कार मिळाले होते. हैदराबादला प्रशिक्षण घेत असताना २०१० मध्ये तो गावी आला होता. याचवेळी त्याचे वरच्या जातीच्या काठी दरबारच्या तरुणांशी वाद झाले. (वृत्तसंस्था)
वृद्ध दलित दाम्पत्याला हवाय न्याय
By admin | Updated: October 15, 2016 01:57 IST