नवी दिल्ली : केंद्र सरकारने उत्पादन शुल्कातील सवलत मागे घेतल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. ही दरवाढ अंतिमत: ग्राहकांच्याच माथी जाणार आहे. कंपन्या टिकाऊ वस्तूंच्या किमतीत ५ पट वाढ करीत आहेत. हायर, व्हर्लपूल, पॅनासोनिक, गोदरेज आणि डाईकिन या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढविण्यास सुरुवात केली आहे. हायर इंडियाचे अध्यक्ष एरिक ब्रेगेंझा यांनी सांगितले की, उत्पादन शुल्काची सवलत संपल्यामुळे किमतीत वाढ करणे अपरिहार्य झाले आहे. आम्ही आमच्या उत्पादनाच्या किमती तीन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढविणार आहोत. मॉडेलनुसार दरवाढीत फरक पडेल. ही दरवाढ नव्या स्टॉकवर लागू असेल. गोदरेज अप्लायंसेजचे व्यवसायप्रमुख कमल नंदी यांनी सांगितले की, आम्ही आमच्या उत्पादनाच्या किमतीत ४ ते पाच टक्के वाढ करीत आहोत. उत्पादन शुल्क वाढीबरोबरच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे कच्चा माल महागला आहे. त्यामुळे आम्हाला किमती वाढविणे आवश्यक झाले आहे. पॅनासोनिकचे प्रबंध संचालक मनीष शर्मा यांनी सांगितले की, उत्पादन शुल्क सवलत बंद करण्याचे व्यापक परिणाम होतील. वस्तू महाग झाल्याने बाजारातील धारणेवर परिणाम होईल. विक्री घटेल. टिकाऊ वस्तू बनविणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारने २ टक्के सवलत दिलेली होती. ही सवलत ३१ डिसेंबरला संपली. तिला मुदवाढ देण्यास सरकारने नकार दिल्यानंतर उत्पादन शुल्क १२ टक्के झाले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ते १0 टक्के होते. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या वस्तूंना टिकाऊ वस्तू असे म्हणतात. इंग्रजीत कंझ्युमर ड्यूरेबल्स या नावाने या वस्तू ओळखल्या जातात. यात टीव्ही, रेफ्रिजरेटर यासारखी घरगुती उपकरणे तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने यांचा समावेश होतो.कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवीत असताना शेतमालाचे भाव मात्र कोसळत आहेत. कापसासारख्या नगदी पिकाचा भावही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाला आहे. भाजीपाल्याचे भाव गेल्या आठवड्यापासून कोसळले आहेत. शेतकऱ्यांनाही भाववाढ करण्याची सोय असावी, अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.
टिकाऊ वस्तू तब्बल पाचपट महागणार!
By admin | Updated: January 8, 2015 23:43 IST