हिंगोली : जिल्ह्यात वसमत, हिंगोली व कळमनुरी हे तीन मतदारसंघ आहेत. त्यापैकी दोनमध्ये काँग्रेस तर एका ठिकाणी राकाँची सत्ता. एका आमदाराचे लोकसभेत प्रमोशन झाल्याने रिक्त जागी इच्छुकांची मोठी संख्या आहे, तर उर्वरित दोन विद्यमान आमदारांची तिकिटे पक्की आहेत. विरोधी गटात मात्र सगळ्यांनाच कामाला लागण्याचे आदेश आहेत. नाव मात्र अंतिम होत नसल्याने बंडखोर वाढण्याची शक्यता आहे.मागील तीन टर्मपासून हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत असलेल्या कॉंग्रेसचे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी प्रचारकार्य सुरू केले आहे, तर भाजपा उमेदवार अजून ठरलेला नाही. मागीलवेळी पराभूत झालेले तान्हाजी मुटकुळे यांच्यासमोर पक्षातूनच आव्हान उभे केले जात आहे. नुकतेच भाजपावासी झालेले मिलिंद यंबल, पुंजाजी गाडे, अॅड. प्रभाकर भाकरे, मनोज जैन, माणिकराव भिंगीकर, बाबाराव बांगर यांचीही दावेदारी आहे. पक्षाने सर्वांनाच झुलवत ठेवले आहे. माजी आ. बळीराम पाटील कोटकर हे दोनदा येथून विजयी झालेले आहेत. मध्यंतरी पक्षांतर करून आता ते पुन्हा भाजपात सक्रिय झाले. बंडखोरीचीही तयारी आहे. यापूर्वी बंडखोरी करणारे राकाँचे माजी आ. साहेबराव पाटील गोरेगावकर व माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाणही आघाडीत बिघाडी झाल्यास उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत. शिवसेनाही युती तुटल्यास पर्यायी तयारी करीत आहे. कळमनुरीचे आमदार राहिलेले राजीव सातव आता खासदार झाले. त्यामुळे येथे कॉंग्रेसकडून डॉ. संतोष टारफे, बाबा नाईक, दिलीप देसाई, जकी कुरेशी, अजित मगर आदी इच्छुक आहेत. मात्र पक्षाचे कोणालाही स्पष्ट संकेत नाहीत. शिवसेनेत माजी आ. गजानन घुगे, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, डॉ. रमेश मस्के, डॉ. वसंतराव देशमुख अशी इच्छुकांची मोठी यादी आहे. कधी कधी हा मतदारसंघ रासपकडे जाणार असल्याची चर्चा होते. त्यामुळे इच्छुक आॅक्सिजनवर आहेत. लोकसभेची जागा सातव यांच्यासाठी काँग्रेसला सोडल्याने राष्ट्रवादीही कळमनुरीची जागा मागत आहे. माजी खा. शिवाजी माने, डॉ. जयदीप देशमुख इच्छुक आहेत. माने यांची अपक्ष म्हणूनही तयारी सुरू आहे. वसमतमध्ये मागील दोन निवडणुकांत राकाँचे आ. जयप्रकाश दांडेगावकर व सेनेचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्यात सरळ लढत झाली. दोनदा निसटती बाजी मारणारे दांडेगावकर पुन्हा रिंगणात राहतील. मात्र राकाँचे अॅड. शिवाजी जाधव यांनी सेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. तर उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणूनही तयारी आहे. इतरही काही दिग्गज तयारीत आहेत. बार उडण्यासाठी कार्यकर्ते दारूगोळा भरत आहेत. त्यामुळे बहुरंगी लढतीची शक्यता बळावली आहे.
अनिश्चिततेच्या सावटाखाली इच्छुकांची कोंडी
By admin | Updated: September 23, 2014 05:00 IST