केंद्रपाडा : फोनी चक्रीवादळात कच्चे घर उद्ध्वस्त झाल्यानंतर ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील एका दलित व्यक्तीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत वितरित करण्यात आलेल्या एका शौचालयालाच घर बनविले आहे. खिरोड जेना (५८), असे या भूमिहीन मजुराचे नाव असून, ते रघुदईपूर गावचे रहिवासी आहेत. या शौचालयात ते आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहत आहेत.
जेना यांनी सांगितले की, ३ मे रोजी आलेल्या चक्रीवादळात माझे घर नष्ट झाले; पण पक्के शौचालय वाचले होते. दोन वर्षांपूर्वी मला हे शौचालय मिळाले होते. आता हेच माझे आश्रय झाले आहे. इथे कधीपर्यंत राहील, हे मी सांगू शकत नाही. ते म्हणाले की, चक्रीवादळानंतर माझे आयुष्यच विस्कळीत झाले आहे.
ते म्हणाले की, पुन्हा घर उभारण्यासाठी नुकसानीच्या अनुदानाची प्रतीक्षा करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. जोपर्यंत अधिकारी मला नुकसानभरपाई देत नाहीत तोपर्यंत हे शौचालयच माझे आश्रयस्थान असेल. सध्या शौचालय रिकामे नसल्याने आम्हाला उघड्यावर शौचालयाला जावे लागत आहे. मे महिन्यात सुरुवातीला ओडिशात आलेल्या चक्री वादळाने राज्यात मोठे नुकसान झाले. (वृत्तसंस्था)