ऑनलाइन टीम
बरेली, दि. ८ - उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यातील नवाबगंज येथील एका विधवा महिलेने मुलीच्या लग्नाप्रीत्यर्थ मेजवानी दिल्याने पंचायत समितीने त्या मुलीलाच घटस्फोट घ्यायला लावल्याची धक्कादायकसमोर आली आहे. हरदुआ किफातुल्लाह गावातील पंचायत समितीतील सदस्य व इतर गावकर-यांना विवाहानंतरची मेजवानी न मिळाल्याने त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली. या घटनेमुळे त्या मुलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून ते गाव सोडून जाण्याचा विचार करत आहेत.
किफातुल्लाह गावात मजीदा नावाची महिला तिच्या चार मुलांसह राहते. काही दिवसांपूर्वी ती आपल्या भावाकडे कोलकाता येथे गेली असता, तेथे तिने आपल्या मुलीचा विवाह केला. मात्र गावी परत आल्यावर पंचायत समितीने तिच्यावर मुलीला कोलकात्यात विकून टाकल्याचा आरोप लावला. लग्नाची मेजवानी द्यावी किंवा नवविवाहीत जोडप्याला समोर आणावे अशी अट पंचायत समितीच्या सदस्यांनी त्या महिलेच्या समोर ठेवली. मजीदा हिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सर्वांना जेवण देणे तिला शक्य नव्हते.त्यामुळे तिने आपली मुलगी व जावयला कोलकात्याहून गावाल बोलावले. मात्र भर पंचायतीत त्यांचा अपमान करण्यात आला व दबाव टाकत त्या मुलीचा घटस्फोट करवण्यात आला. मजीदा यांनी या प्रकाराला आक्षेप दर्शवला असता गावातल्याच एखाद्या मुलाशी मुलीचा विवाह करून द्यावा असा अजब सल्ला समितीच्या सदस्यांनी तिला दिला.
याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.