ऑनलाइन टीम
भुवनेश्वर, दि. २६ - वही, पेन्सिल व इतर शालेय साहित्यासाठी पैसे न मिळाल्याने ओदिशामध्ये एका १४ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुवनेश्वरपासून सुमारे १७० किमी दूर अंतरावरील गंजम जिल्ह्यातील असका गावात ही घटना घडली असून जयंती असे मत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.
सातव्या इयत्तेत शिकणा-या जयंतीची २३ जूनपासून शाळा सुरू झाली. शालेय साहित्य विकत आणण्यासाठी तिने पालकांकडे पैसे मागितले. मात्र तेव्हा त्यांच्याकडे पैस नसल्याने त्यांनी तिला काही दिवस थांबायला सांगितले. या घटनेमुळे नाराज झालेल्या जयंतीने बुधवारी पालक घरात नसताना स्वत:च्या अंगावर केरोसिन ओतून जाळून घेतले. या घटनेत ५० टक्के भाजलेल्या जयंतीला तिच्या शेजारच्यांनी तातडीने स्थानिक रुग्णालयात नेले, मात्र अखेर तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जयंतीचे वडील रोजगारावर काम करताता, मात्र नुकताचा त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते आता काम करू शकत नाहीत. जयंतीची आह लोकांकडे धुण्या-भाड्यांची काम करते. मुलीच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.