सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : अजिबात काळजी करू नका, सर्वकाही पुन्हा सुरळीत होईल. तुम्ही पुन्हा मन लावून अभ्यास करा, मनमुराद खेळा आणि भरपूर मित्र बनवा असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पूंछमधील एका शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगितले.
पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या झैन अली, उर्वा फातिमा या जुळ्या भावंडांच्या वर्गमित्रांना ते भेटले व त्यांना धीर दिला. मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी विचारपूस केली.
‘घराच्या तळमजल्यावर होतो, त्यामुळे बचावलो’
पाकिस्तानच्या माऱ्यात जिच्या घराचे खूप नुकसान झाले अशा एका मुलीने राहुल गांधी यांना सांगितले की, आम्ही पाच बहिणी आहोत. वडिलांचे १६ वर्षांपूर्वी निधन झाले. घरावर तोफगोळा आदळला तेव्हा आम्ही तळमजल्यावर होतो. थोडक्यात बचावलो. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांनी भरपाईची रक्कम वाढविण्यात यावी.
नुकसानग्रस्त घरे, धार्मिक स्थळांची केली पाहणी
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या माऱ्यामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी शनिवारी भेट घेतली. पूंछ येथे नुकसान झालेली घरे, धार्मिक स्थळांची पाहणी केली. काँग्रेसचे जम्मू-काश्मीरचे प्रभारी सय्यद नसीर हुसेन, सरचिटणीस जी. ए. मीर, प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कर्रा, माजी मंत्री रसूल वानी आदी यावेळी उपस्थित होते.
झैन व फातिमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद
या महिन्याच्या सुरुवातीला नियंत्रण रेषेजवळ झालेल्या जोरदार गोळीबारामुळे पूंछ शहरातील अनेक घरांचे नुकसान झाले तसेच प्राणहानीही झाली. ७ मे रोजी झालेल्या गोळीबारात झैन व फातिमा यांचा मृत्यू झाला. ते शिकत असलेल्या क्राइस्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला.