ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - दहशतवादाविरोधात कठोर धोरण राबवण्याची ग्वाही मोदी सरकार देत असले तरी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या भारतातील तरुणांविरोधात मोदी सरकारने फौजदारी कारवाई न करण्याची भूमिका घेतल्याचे समजते.
भारतातील सुमारे १८ -२ ० तरुण इराकमध्ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील चार तरुणांचाही समावेश आहे. इराकमधील दहशतवादी संघटनेत भरती झालेले हे तरुण भारतात परतल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका मोदी सरकारने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदेशीरदृष्ट्या या तरुणांनी भारतात कोणताही गुन्हा केलेला नसल्याने त्यांच्यावर देशात कोणताही गुन्हा दाखल करता येणार नाही. या तरुणांवर कारवाई केल्यास आयएसआयएसमध्ये गेलेले तरुण पुन्हा कधीच भारतात परतणार नाही तसेच त्यांचे पालकही मुलांविषयीची माहिती पोलिसांना देणार नाहीत असे एका अधिका-याने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या तरुणांविरोधात कारवाई न करता त्यांना काही दिवस देखरेखीखाली ठेवणे हा उत्तम उपाय असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.
गृहमंत्रालयाने या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. मात्र काही अधिका-यांनी यावर नाराजी दर्शवली आहे. या तरुणांविरोधात एफआयआर दाखल करुन अटक न केल्यास या तरुणांना इराकमध्ये पाठवणा-यांची माहिती कशी समोर येणार असा सवाल एका अधिका-याने उपस्थित केला.