यंदा जिल्ह्यात ४६०६ मिमी कमी पाऊस
By admin | Updated: September 26, 2015 19:27 IST
धरणांमध्ये साठा कमी : खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता
यंदा जिल्ह्यात ४६०६ मिमी कमी पाऊस
धरणांमध्ये साठा कमी : खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यताठाणे : ठाणे हा अतिपावसाचा जिल्हा म्हणून संबोधला जात असताना मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जिल्ह्यात ४,६०६ मिमी पाऊस कमी पडला आहे. यामुळे पाणीपुरवठा करणार्या धरणांमधील पाणी साठा कमी झाला आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.जिल्ह्यात मागील वर्षी आजच्या दिनांकापर्यंत १६८६८.५४ मिमी पाऊस पडला होता. सरासरी २४०९.७९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्या तुलनेत या वर्षी आजपर्यंत १२ हजार २६२.७५ मिमी पाऊस पडला असून या पावसाची सरासरी एक हजार ७५१.८२ मिमी नोंद झाली आहे. यावरून जिल्ह्यात ४,६०६ मिमी म्हणजे सरासरी ६५८.१५ मिमी कमी पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी सर्वाधिक पाऊस ठाणे तालुक्यात १९२५.६० मिमी पडला आहे. सरासरी ७८ टक्के पाऊस झाला असून मागील वर्षी २५४८.८० मिमी पाऊस पडला होता. याप्रमाणेच भिवंडी तालुक्यात १८८४ मिमी तर या खालोखाल कल्याण १८१७.५० मिमी, उल्हासनगर १७४१.७४, शहापूर १७१८.२०, अंबरनाथ १६५५.२१ आणि मुरबाडला सर्वात कमी १५२०.५० मिमी पाऊस पडला असून येथे कमी पावसाची नोंद असली तरी या कालावधीत वादळ-वार्यापासून सर्वाधिक नुकसान मुरबाडमध्येच झाल्याचे निदर्शनात आले आहे. (प्रतिनिधी)