ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आता पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारत काँग्रेसची धुरा सांभाळावी असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.
'राहुल गांधीनी त्यांची आई व काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी. देशातील जनतेशी संवाद व संपर्क साधण्यासाठी त्यांनी भारत यात्राही करावी' असे मत सिंह यांनी व्यक्त केले. तसेच सोनिया गांधी यांनी पक्षाच्या मेंटर म्हणून कायम रहावे असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकेल अशी कोणीतीही व्यक्ती पक्षात नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर राहुल गांधीच्या नेतृत्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र आपल्या या विधानांतून दिग्विजय सिंह यांनी सर्वांनाच उत्तर दिले आहे.