ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. ५ - शिवजयंतीच्या नावे हप्तावसूली करणारे शिवरायांचे वारसदार कसे अशी टीका करणा-या देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना खंडणी गोळा करत होती तर भाजप गेली २५ वर्ष
खंडणीतील वाटेकरी होता का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असल्याने शिवसेनेवर टीका करणार नाही अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली असली तरी शिवसेना व भाजपचे राज्यस्तरीय नेत्यांमध्ये आरोप - प्रत्यारोपाची मालिका सुरुच आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली होती. या टीकेला रविवारी उद्धव ठाकरेंनी विदर्भ दौ-यात प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून भारताचा तुकडा परत कधी आणणार असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी मोदींना विचारला आहे. विदर्भ विकासापासून कोसो दूर असून या भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करु. मात्र विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ देणार नाही असे ठाकरेंनी स्पष्ट केले. सत्तेवर आल्यास महाराष्ट्र भारनियमनमुक्त करु. नागपूरला ट्रान्सपोर्ट हब करु असे आश्वासनही त्यांनी वर्ध्यातील सभेत दिले आहे.