ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अॅमेझॉन, ई-बे यांसारख्या ऑनलाइन खरेदी संकेतस्थळांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या संकेतस्थळांमुळे स्वदेशी उद्योगांचे नुकसान होत असल्याचे सांगत संघाने सरकारकडे ही मागणी केली आहे. तसेच 'फ्लिपकार्ट' या भारतीय कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी भांडवल असल्याने त्यावरही बंदी घालावी असेही संघाचे म्हणणे आहे. 'स्वदेशी जागरण मंचा'च्या नेत्यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन सरकारच्या परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यात बदल करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती.
'ई-कॉमर्स' क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीवर कायद्याने बंदी असावी. अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्याना देशात विक्री करता येऊ नये. ऑनलाइन व्यवहारांवर सरकारचे नियंत्रण नाही. कायद्यातील तरतुदी व पळवाटांचा आधार घेऊन या कंपन्या व्यवहार करतात. त्यामुळे कायद्यातील हे दोष दूर करण्याची गरज आहे, असे स्वदेशी जागरण मंचाच्या अश्वनी महाजन यांनी सांगितले.