ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - दिल्लीत संसदेच्या परिसरात रविवारी दुपारी भीषण आग लागली असून अागीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने संसदेच्या परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांशिवाय अन्य कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
रविवारी दुपारी संसदेच्या रिसेप्शन कार्यालयाजवळ भीषण आग लागली. झाडांमुळे आगीचे लोण वेगाने पसरले असून धूराने संसदेच्या परिसर व्यापला आहे. आगीमुळे संसदेतील मुख्य इमारतीला कोणतेही नुकसान झालेले नाही असे स्पष्टीकरण अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. संसदेच्या गेट नंबर ५ जवळील एसी प्लँटजवळ आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुट्टीचा दिवस असल्याने संसदेत सुरक्षा रक्षकांशिवाय अन्य कर्मचारी उपस्थित नव्हते. आगीत संसदेच्या कागदपत्रही सुरक्षित असल्याचे सांगितले जाते.