नवी दिल्ली : १६ व्या लोकसभेत निवडून येणार्या सदस्यांच्या स्वागतासाठी लोकसभा सचिवालयाने विशेष तयारी केली आहे. यात विमानतळ, रेल्वे स्थानकावरून सदस्यांचे स्वागत करतानाच त्यांंंच्या उतरण्याची, नोंदणीची व ओळखपत्रांंच्या सुविधेसह अन्य व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. लोकसभेचे सरचिटणीस पी. श्रीधरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सदस्यांच्या दिल्लीतील आगमनाकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राजधानीतील विविध आगमन स्थळांवर सहा मार्गदर्शक केंद्रे व गाइड पोस्ट निर्माण केले आहेत. हे गाइड पोस्ट लोकसभेच्या पहिल्या सत्रातील पहिले तीन दिवस कार्यरत राहतील. संसद भवनाच्या खोली क्र. ६२ मध्ये नवनियुक्त सदस्यांना आवश्यक ती सुविधा पुरविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली व दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन या रेल्वे स्थानकांवर सदस्यांच्या स्वागताची तयारी सज्ज आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल १ डी व ३ वर मार्गदर्शक केंद्र व गाइड पोस्टची व्यवस्था आहे. या सदस्यांच्या उतरण्यासाठी राज्यातील गेस्ट हाऊस व हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त लोकसभेच्या कामकाजाची माहिती देणारी पुस्तिका, भारताचे संविधान या बाबीही त्यांच्यासाठी उपलब्ध करून ठेवल्या आहेत.
दिल्ली सज्ज
By admin | Updated: May 16, 2014 03:56 IST