पणजी : मान्सूनचा परतीचा प्रवास सात दिवसांनी लांबला आहे. उत्तर भारतात मान्सून अधिक काळ सक्रिय राहिल्यामुळे हा बदल घडला आहे. गोव्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा ४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या महितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास २५ सप्टेंबरपर्यंत सुरू होतो. मुंबईत ही प्रक्रिया १० आॅक्टोबर, तर गोव्यात ११ किंवा १२ आॅक्टोबरला घडते. परंतु परतीच्या प्रवासाची सुरुवातच लांबल्यामुळे आता गोव्यात नियोजित वेळेस मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू होईल की, ७ दिवसांनी लांबेल, याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. मान्सून परतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नियोजित वेळेत मुंबई आणि गोव्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याच्या गोवा विभागाच्या संचालक व्ही. के. मनी यांनी सांगितले.गोव्यात यंदा सरासरी ११८ इंच पाऊस झाला. गेल्या वर्षी २२ सप्टेंबरपर्यंत ११४ इंच पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाचा पाऊस ४ इंच म्हणजेच ४ टक्के अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच एल निनोच्या प्रभावामुळे सुरवातीला दुष्काळसदृश्य स्थितीची भीती व्यक्त होत होती. हवामान विभागाने ३० ते ४० टक्के पाऊस कमी पडणार असल्याचे भाकित वर्तविले होते. मात्र एल निनोचा प्रभाव संपल्यानंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने गोव्यात पोकळी तर भरून काढलीच; शिवाय गेल्या वर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. (प्रतिनिधी)
परतीचा मान्सून लांबणीवर
By admin | Updated: September 23, 2014 04:54 IST