नवी दिल्ली : भारत सरकारची चर्चा करायची की भारत तोडू इच्छिणाऱ्या फुटीरवाद्यांशी ते आधी पाकिस्तानने ठरवावे आणि निर्णय घ्यायचा तो शहाणपणाने घ्यावा, असा गर्भित इशारा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिला आहे़आज बुधवारी ‘भारत आर्थिक शिखर’ बैठकीत जेटली बोलत होते़ गत आॅगस्टमध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी फुटीरवाद्यांना चर्चेसाठी बोलवल्यानंतर भारताने पाकसोबतची परराष्ट्र सचिवस्तरावरील बैठक तडकाफडकी रद्द केली होती़ याच संदर्भाने बोलताना जेटली म्हणाले की, पाकिस्तानसोबत चर्चेस भारत तयार आहे़ भारत-पाक संबंध सामान्य व्हावेत, अशी आमची इच्छा आहे़ मात्र काही ‘लक्ष्मणरेषा’ आहेत़ आम्ही उभय देशात द्विपक्षीय चर्चेसाठी वातावरणनिर्मिती केली़ त्यानंतर परराष्ट्र सचिवस्तरावरील बैठक ठरली़ मात्र आमचे परराष्ट्र सचिव चर्चेसाठी पाकिस्तानला रवाना होणार त्याच्या काही तास आधी भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांनी फुटीरवाद्यांना चर्चेसाठी बोलविले़ तेव्हा भारत सरकारशी चर्चा करायची की फुटीरवाद्यांशी, चर्चा नेमकी कुणासोबत करायची याचा पाकने आवश्य विचार करावा़, असे ते म्हणाले. पाकिस्तान शहाणपणाने निर्णय घेत नाही, तोपर्यंत पाकसोबत चर्चा अशक्य आहे, असेही जेटली यांनी स्पष्टपणे बजावले़(लोकमत न्यूज नेटवर्क)
चर्चा कुणाशी हे आधी ठरवा
By admin | Updated: November 6, 2014 03:15 IST