ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. २५ - मध्यप्रदेशमधील सतना जिल्ह्यातील कामतनाथ मंदिराच्या डोंगरावर चेंगराचेंगरी झाल्याने १० भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे घडली. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश असून या अपघाताप्रकरणी जिल्हाधिका-यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
सतना जिल्ह्यातील मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशच्या सीमेवरील चित्रकूट भागातील कामतनाथ डोंगरावर सोमवती अमावस्येला परिक्रमा केली जाते. सोमवारी पहाटेपासून भाविकांनी या परिक्रमेसाठी कामथनाथ मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी गर्दी केली. ही परिक्रमा लोटांगण घालून केली जाते. मात्र गर्दी जास्त असल्याने परिक्रमेदरम्यान चेंगराचेंगरी झाली व यात १० भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सुमारे ६० भाविक जखमी झाल्याचे स्थानिक अधिका-यांनी सांगितले. परिक्रमेचा मार्ग ५ किलोमीटरचा असून या मार्गावर अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. यातील कामतनाथ मंदिर हे सर्वात मोठे मंदिर आहे.