सायकल दुकानदारावर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: February 6, 2015 01:17 IST
क्षुल्लक कारण : कामगारनगरात तणाव
सायकल दुकानदारावर प्राणघातक हल्ला
क्षुल्लक कारण : कामगारनगरात तणाव नागपूर : फुटबॉलमध्ये हवा भरण्यास नकार दिला म्हणून सायकल दुकानदारावर आरोपींनी प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात मोहम्मद करीम शेख मोहम्मद सलीम शेख (वय ३७) हे गंभीर जखमी झाले. जरीपटक्यात बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. करीम शेख यांचे जरीपटक्यातील कामगारनगरात सायकल स्टोर्स आहे. आरोपी रज्जब अली (वय ३५) याचा पुतण्या बुधवारी रात्री ८ च्या सुमारास फुटबॉलमध्ये हवा भरण्यासाठी गेला. दुकानात नोकर नसल्यामुळे करीम यांनी हवा भरून देण्यास नकार दिला. त्यामुळे मुलगा घरी गेला. त्याने रज्जब अलीला हे सांगितले. या क्षुल्लक कारणावरून रज्जब आणि इजाज पहेलवान (वय ३६, रा. दोघेही कामगारनगर) करीमच्या दुकानावर चालून गेले. दोघांनी करीमला अश्लील शिवीगाळ केली. इजाजने करीम यांच्या डोक्यावर तलवारीने घाव घातला. आरडाओरडीमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक जमले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. आरोपी पळून गेल्यानंतर करीम यांना मेयोत दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी कलम ४५२, ३०७,३४ अन्वये गुन्हा दाखल केला.---